ज्योतिष शास्त्राबद्दल आपणा सर्वांनाच कुतुहल असतं. प्रत्येक जण आयुष्यात एकदा तरी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषाकडे जातोच. खगोलशास्त्र हे ज्योतिष शास्त्राचा आधार आहे पण ज्योतिषाशास्त्र खगोल शास्त्रापेक्षा फारच वेगळे आहे. ज्योतिषशास्त्राची पायाभूत तत्वे फारच भिन्न आहेत. आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, यांच्या गती गुरुत्वाकषेणाचा पृथ्वीवर, पृथ्वीवरील सजीव सृष्टीवर व पर्यायाने मानवावर परिणाम होत असतो, या तत्वावर ज्योतिष शास्त्र आधारले आहे. सृष्टी घडण्याच्या घटनांचा व ग्रहतार्यांचा संबध आहे. जन्मकालीन ग्रहांची स्थिती मानवाच्या जीवनात उलथापालथ घडवून आणते. त्याच्या कर्मावर, स्वभावावर व त्याचप्रमाणे शरीरस्वास्थ्यावर जन्मकालीन तसेच गोचरीच्या ग्रहस्थितीचा परिणाम होत असतो.
व्यक्तिची कुंडली ही त्याच्या 'जेनेटीक ब्लूप्रिट' प्रमाणे असते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. चिकित्सा कराव्यास कठीण अशा रुग्णांवर चिकित्सा करताना त्यांची जनुकिय संरचाना पाहून उपचार केल्यास चिकित्सा यशस्वी होण्यास सहायभूत ठरते. त्याचप्रमाणे व्यक्तिची कुंडली ही चिकित्सा करण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते.
उदाहरण द्यायचे झाल्यास स्थौल्य या व्यधीचे देता येईल. स्थौल्य किंवा अतिस्थौल्य हा एक चिवट, चिकित्सा करण्यास कठीण आजार आहे. म्हणूनच आयुर्वेदात म्हंटले आहे " कार्श्यम एव वरं स्थौल्यात". आयुर्वेदात अति स्थौल्याच्या कारणांमध्ये कफ, मेद, वृध्दी आणि शरीरात पृथ्वी व जलमहाभूताधिक्य या कारणांना विशेष महत्त्व दिले आहे. यासाठी सहाय्यभूत ठरणारी कारणे म्हणजे सतत पचायला , थंड, मधूर, रसात्मक पदार्थांचे सेवन करणे, व्यायाम न करणे, जेवणानंतर लगेच झोपणे, सुखी व चिंतामुक्त जीवन जगणे, ऐशआरामात राहणे इत्यादि यामूळे शरीर घटकात गुरु गुणाची वृध्दी होते व पर्यायाने कफ व मेदाची वृध्दी होते. याने पृथ्वी व जलमहाभूत प्रमाणाबाहेर वाढतात.
पण या बरोबर शरीरप्रकृतीचा विचार करणेही तेवढेच महत्त्वाचे ठरते. मुळातच कफ प्रकृती आणि पृथ्वी व जलमहाभूताधिक्य असणारी शरीरयष्टी कायम स्यूलतेकडे झुकणारी असते. हे जाणण्यासाठी ज्याप्रमाणे प्रकृतीपरीक्षण सांगितले आहे. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रात कुंडलीतील प्रथमस्थानाचा म्हणजेच लाग्नस्थान किंवा तनुस्थानाचा अभ्यास करावयास सांगीतले आहे. लग्नस्थान हे त्या व्यक्तिच्या शरीराची ठेवण, रुप, प्रतिकारशक्ति (जी त्याला जन्मतः प्राप्त झालेली असते) या बद्दल ज्ञान देते.
गुरु ग्रह हा पृथ्वी व जलमहाभूताधिक्याचा, मेद प्रकृतीचा व संचय करणारा ग्रह आहे. तसेच शनी ग्रह हा वायु महाभूताधिक्याचा वात प्रकृतीचा, रुक्ष ग्रह आहे. गुरु म्हणजे आनंदी स्वभावाचा तर शनी म्हणजे कायम चिंतेने ग्रासलेला.
जर एखाद्या व्यक्तिच्या लगनस्थानी गुरु ग्रह असेल, गुरुची राशी असेल किंवा लग्नस्थानावर गुरुची दृष्टी असेल किंवा लग्नस्थानी गुरु जलप्रधान राशीत असेल किंवा यापैकी कुठलेही कॉम्बिनेशन असेल तर शरीर प्रकृती स्थुल असण्याची शक्यता असते. याविपरित जर एखाद्या व्यक्तिच्या लग्नस्थानी शनी असेल, शनीची रास असेल. किंवा शनीची दृष्टी असेल किंवा यातील कुठलेही कॉम्बिनेशन असेल तर शरीर प्रकृती कृश असण्याची शक्यता असते. याप्रकारे जन्मतःच एखाद्या व्याक्तिची पत्रिका बघून त्याची शारीरीक ठेवण पुढे कशी असेल याचा अंदाज लावता येऊ शकतो. अशाप्रकारे लग्नी गुरुचा प्रभाव असणार्या व्यक्तिंनी संभाव्य स्थौल्याचा धोका लक्षात घेऊन आयुर्वेदात संगितल्याप्रमाणे गुरु तत्त्वाचे, कफ मेद वाठवणारे, पृथ्वी तत्त्वाचे पदार्थ टाळल्यास व त्याबरोबरच आहारविहाराच्या नियमा चे पालन केल्यास भविष्यात येणार्या स्थौल्याला टाळता येऊ शकते व याशिवाय व्यक्तिची पत्रिका अभ्यासून त्याप्रमाणे, औषधी चिकित्सा, रत्न व मंत्रांचा वापर केल्यास अधिक फायदा होताना दिसतो.
याप्रमाणे गेली ७ / ८ वर्षे आम्ही रुग्णांच्या पत्रिकेचा अभ्यास करुन उपचार देत आहोत व त्यामध्ये आम्हाला चांगलेच यश मिळत आहे. या सर्व माहितीच्या विश्लेषणाकरुन असे दिसते कि ज्योतिषशास्त्र हे आयुर्वेदीय वैद्यकिय शास्त्राला चिकित्सा देताना सहाय्यभूत ठरु शकते. पण तरीही यावर अजून संशोधन होण्याची आवश्यकता आहे.
डॉ. विनोद ठक्कर - आयुर्वेदाचार्य व ज्योतिषशास्त्रविश्लेशक
Wednesday, April 7, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment